एखादी अशनी पृथ्वीच्या रोखाने निघाली आहे असं आपल्याला समजलं, तर आपण काय करू? या विषयांवर अनेक विज्ञानकथा आहेत आणि ब्लॉकबस्टर चित्रपटदेखील निघालेले आहेत. सर्वसामान्य जनता घाबरून जाते, पण हुशार शास्त्रज्ञ त्यावर एक भन्नाट तोडगा काढतात. अशनीवर एक यान आदळून तिची दिशा बदलतात आणि आपल्यावरचं संकट दूर करतात. अशी कथाकल्पना रोमांचक आहे खरी, पण हीच रोमांचक कल्पना आता प्रत्यक्षात उतरली आहे!
आपल्यापासून सुमारे एक कोटी किलोमीटर अंतरावर अशनींची एक जोडगोळी आहे. डायमॉर्फस आणि डिडीमॉस. त्यातली डायमॉर्फस अशनी छोटी आहे आणि ती डिडीमॉस या मोठ्या अशनीभोवती फिरते आहे. डायमॉर्फसचा पृथ्वीला कोणताही धोका नाही. म्हणूनच नासाने डायमॉर्फसवर एक यान आदळवून तिची कक्षा बदलण्याची चाचणी मोहीम हाती घेतली. तिचं नाव डबल ऍस्टरॉइड रिडायरेक्शन टेस्ट, म्हणजे थोडक्यात डार्ट. हा डार्ट उर्फ तीर 24 नोव्हेंबर 2021मध्ये पृथ्वीवरून निघाला. त्याचा वेग होता ताशी चोवीस हजार किलोमीटर.
अशी पहिलीच मोहीम असल्याने शास्त्रज्ञांना उत्सुकता होती आणि ते सतत डार्टचा वेध घेत होते. या आठवड्यात आपल्या वेळेनुसार मंगळवारी 27 सप्टेंबरच्या पहाटे या तीराने अचूक निशाण साधलं. इतक्या दूरवर असलेली छोटीशी अशनी, त्यातून केवळ दीडशे मीटर व्यासाची, म्हणजे किती कठीण लक्ष्य आहे, विचार करा. पण आपल्या तंत्रज्ञानाने अचूक कामगिरी पार पाडली म्हणून शास्त्रज्ञांना हुरूप आला आहे.
या शरसंधानाने डायमॉर्फसच्या कक्षेत किती बदल झाला हे समजायला थोडा वेळ लागेल. अवकाशातली अंतरं आणि कक्षांचा कालावधी पाहता, त्याबाबत इतक्या लवकर निष्कर्ष काढता येणार नाही. तिथे पोहोचायच्या पंधरा दिवस आधी यानातून क्यूबसॅट इमेजिंग यंत्रणा बाहेर सोडली होती. त्यातल्या कॅमेऱ्याने प्रत्यक्ष आघाताचे फोटो घ्यावेत अशी योजना होती. हे फोटो एक एक करत येत्या आठवड्यात आपल्यापर्यंत पोहोचतील. यानातली ड्राको यंत्रणाही आघाताचे फोटो घेईल अशी व्यवस्था केली होती. ते थरारक फोटो नासाच्या वेबसाइटवर पहायला मिळतील.
त्याचबरोबर आपल्या पृथ्वीवरच्या दुर्बिणी डायमॉर्फसचं निरीक्षण करत राहणार आहेत. नंतर 2024 मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीची हेरा मोहीम डायमॉर्फसच्या कक्षेचं काटेकोर मापन करणार आहे. सध्या डायमॉर्फस अशनी डिडीमॉसला फेरी घालण्यासाठी बारा तास घेते. आपला डार्ट तीर घुसल्यावर डायमॉर्फसची फेरी सुमारे दहा मिनिटांनी कमी होईल असा अंदाज आहे. हेरा मोहीम याची खात्री करून घेईल.
प्लॅनेटरी डिफेन्स म्हणजे आपल्या पृथ्वी ग्रहाची अशी एक वेगळी संरक्षण व्यवस्था उभी राहात आहे. अवकाशातून येणाऱ्या वस्तूंपैकी कशाचा आपल्याला धोका आहे यावर तिची सतत नजर असेल. अशनीसारख्या धोक्यांवर उपाय म्हणून ती नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत आहे. डार्टच्या यशामुळे आता या योजनेला जोराची चालना मिळेल.