कोयनानगर -कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे धरणाची जलपातळी नियंत्रित झाल्याने कालपासून साडेतीन फुटावर स्थिर ठेवण्यात आलेले धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटांवर ठेवण्यात आले आहेत.
सध्या कोयना धरणातून नदीपात्रात 10264 क्युसेक पाण्याचा विसर्ग सूरू असून धरणात 103.95 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 27,782 क्युसेक इतकी आहे. चोवीस तासांत पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 32, नवजा येथे 44 तर महाबळेश्वर येथे 62 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरूवारी दिवसभरात पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर 20, नवजा 18 तर महाबळेश्वर येथे 32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची जलपातळी 2162.06 फूट झाली असून धरण 99 टक्के भरले आहे.