लम्पीचा प्रभाव नसल्याचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा निर्वाळा
मंचर – गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवसापासूनच शौकिनांची मांसाहारासाठी दुकानावर गर्दी होऊ लागल्याने चिकन-मटणाचे बाजारभाव कडाडले आहेत. लम्पी रोगाचा कोणताही सबंध कोंबडी, मेंढी किंवा बकऱ्याशी नसल्याचा निर्वाळा पशुसंवर्धन विभागाने दिल्याने खवय्ये बिनधास्तपणे चिकन, मटणावर ताव मारत आहेत. मात्र, सध्या काही समाजकंटक समाज माध्यमातून लम्पी आजाराचे चित्र जाणून बुजून व्हायरल करत असल्याने बॉयलर कोंबडी आणि मटण विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता घाऊक बाजारामध्ये वर्तविण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासूनच बॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग रेटमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. 160 ते 170 रुपये किलो दराने मिळणारे चिकन आठच दिवसांमध्ये 230 रुपये किलो दरम्यान गेले आहेत. बॉयलर कोंबडीचे लिफ्टिंग रेट 125 रुपये किलो दरम्यान गेले आहेत. लिफ्टिंग रेट मध्ये दररोज 10 ते 15 रुपयांनी वाढ होत असल्याचे कंपनी आणि पोल्ट्री चालकांना सुगीचे दिवस लागले आहेत.
सध्या मांसाहार शौकिनांची मागणी वाढल्याने चिकनच्या मालाची कमतरता जाणवत आहे. लम्पी रोगासंदर्भात काही समाजकंटक व्हॉट्सऍपच्या माध्यमातून फोटो व्हायरल करीत आहेत. ती माहिती संपूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे चिकन, मटण खाण्यास काहीही हरकत नाही. समाज माध्यमातून लोकांना संभ्रमित करणाऱ्यांवर प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत, असे आवाहन आंबेगाव ऍग्रोचे शफी मोमीन, ऊर्जा कंपनीचे व्यावसयिक प्रमोद हिंगे पाटील यांनी केले आहे.
लिफ्टिंग रेट वाढल्याने सुगीचे दिवस
चिकन-मटणच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली असल्याचे बॉयलर कंपनी व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीकडून सांगण्यात येत आहे. बॉयलर कोंबडीचे लिफ्टिंग रेट वाढल्यामुळे बॉयलर फार्मिंग करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहे.
बॉयलर कोंबडीमध्ये लम्पी आजाराची लक्षणे आढळलेली नाहीत. काही खोडसाळ व्यक्ती जाणूनबुजून असे चित्र समाज माध्यमातून व्हायरल करून लोकांना संभ्रमित करीत आहे. लम्पी आजार फक्त गाई आणि बैलामध्येच आढळलेला आहे. या आजाराची लक्षणे अद्यापही म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि बॉयलर कोंबड्यांमध्ये आढळलेली नाहीत.
– वृषाली म्हस्के, पशुवैद्यकीय अधिकारी, कळंब