बर्मिंगहॅम – भारताची नावाजलेली महिला मुष्टियोद्धा निखत झरीन हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत अफलातून कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. जागतिक विजेतेपदानंतरचे हे निखतचे आणखी मोठे यश ठरले.
निखतने महिलांच्या 51 किलो वजनी गटात रविवारी झालेल्या अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या कॅरी मॅकनॉलचा 5-0 असा धुव्वा उडवला. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचे हे 48 वे पदक ठरले. मुष्टियुद्धातील हे तिसरे, तर राष्ट्रकुल कारकिर्दीतील निखतचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे.
पहिल्या फेरीत निखतने आपली गुणवत्ता सिद्ध करताना 10 पैकी 10 गुण मिळवले. दुसऱ्या व तिसऱ्या फेरीतही तिने वर्चस्व राखवे व या सामन्यासह सुवर्णपदकावरही आपले नाव कोरले. कॅरी मॅकनॉल ही निखतपेक्षा तब्बल 7 वर्षांनी मोठी आहे. मात्र, तरीही निखतने तिला चांगलेच सतावले. प्रत्यक्ष सामन्यात ती निखतसमोर खूपच थकल्यासारखे दिसून आले व तिथेच निखतचे पदकही निश्चित झाले.
दरम्यान, सुवर्ण पदक पटकावल्यानंतर निखतने माध्यमांशी संवाद साधला, ‘वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर मोठ्या स्पर्धेतील ही आपली दुसरी कामगिरी आहे. लोकांना माझ्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, त्यांच्या अपेक्षांवर मी खरी उतरले याचा मला आनंद आहे. यापुढेही क्रीडा क्षेत्रात योगदान देऊन देशाचे नाव उंचवायचे आहे.’ असं मत तिने मांडल.
#CommonwealthGames2022 | I’m thrilled to have won the Gold for my country. This was my next major competition after World Championships; people expected me to win Gold here as well, so I am very glad: Indian boxer Nikhat Zareen after winning Gold in the 48-50kg flyweight category pic.twitter.com/mMuiJOYS4F
— ANI (@ANI) August 7, 2022