मुंबई – शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने भाजपचा पाठींबा घेत राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेना कोणाची यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच खडाजंगी सुरु आहे. सवोच्च न्यायालयामध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यावर ८ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट ठाकरे गट असा उल्लेख करत मूळ शिवसेना आपलीच असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटरवरून त्यांना शुभेच्छा देत शिवसेना पक्षप्रमुख या शब्दाचा उल्लेख करण टाळल होत. आता शिंदे यांनी केलेल्या ट्विटमध्ये ठाकरे गट असा उल्लेख केला आहे. नुकतंच राज्यात ठिकठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. याची आकडेवारी शिंदे यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी आपला उल्लेख शिवसेना असा करत इतर शिवसेनेचा उल्लेख ठाकरे गट असा केल्याचे पाहायला मिळते.
काय म्हटलंय नेमकं ट्विटमध्ये
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना – भाजपा युती सरकारला जनतेचा कौल… शिवसेना – भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना – भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार अशा आशयाचे ट्विट शिंदे यांनी केले आहे. तसेच टाकलेल्या पोस्टरवर स्वतःचा उल्लेख शिवसेना असा करत ठाकरे गट असा उल्लेख उर्वरित सेनेचा केला आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना – भाजपा युती सरकारला जनतेचा कौल…
शिवसेना – भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना – भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार… pic.twitter.com/2Y72CAFuSy
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 6, 2022
विशेष म्हणजे शिंदे यांनी यावेळी पोस्टरवर बाळासाहेब ठाकरेंसंह आनंद दिघे यांचा देखील फोटो लावल्याचे पाहायला मिळते. यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.