मुंबई – पुण्यातील बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांनी डीएचएफएल’मधून मिळालेल्या 550 कोटी रुपयांपैकी लंडनमध्ये मालमत्ता खरेदी करण्यासाठी 300 कोटी रुपये खर्च केले असल्याचा दावा सीबीआयने आपल्या आरोपपत्रामध्ये केला आहे.
दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अर्थात डीएचएफएल’ आणि येस बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने अविनाश भोसले यांना अटक केली आहे. या संदर्भात सीबीआयने या आठवड्याच्या सुरुवातीला आरोपपत्र दाखल केले आहे.
या प्रकरणातील सहआरोपी संजय छाबरिया याने डीएचएफएल’ ला येस बॅंकेकडून कर्ज म्हणून मिळालेल्या निधीपैकी 317.40 कोटी रुपये भोसले आणि त्यांच्या कंपन्यांकडे वळवले, असे पुरवणी आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. तसेच एबीआयएल इन्फ्रास्ट्रक्चरला 43 कोटी रुपये आणि मेट्रोपोलिस हॉटेल्सला 140 कोटी रुपये वितरित केले गेले असल्याचेही सीबीआयने म्हटले आहे.
येस बॅंकेने एप्रिल-मे 2018 मध्ये डीएचएफएल’ मध्ये गुंतवणूक केल्यानंतर लगेचच डीएचएफएल’चे कपिल वाधवन यांनी हे वितरण मंजूर केले होते. एबीआयएल इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रोपोलिस हॉटेल्स या दोन्ही भोसले यांच्या मालकीच्या किंवा नियंत्रित आहेत. याशिवाय, कपिल वाधवन यांनी वित्तपुरवठा केलेल्या अनेक प्रकल्पांसाठी भोसलेच्या इतर तीन संस्थांना सल्लागार शुल्क म्हणून 68.80 कोटी रुपये मिळाले, असे आरोपपत्रात म्हटले आहे.