मुंबई – मुंबईतील शिवाजी नगर बैगन वाडी परिसरात दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चार व्यक्ती त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शकील जलील खान वय 34 आणि त्यांची पत्नी नाझिया शकील खान, त्यांचा 7 वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी असे एकूण चार जण मृतावस्थेत आढळले आहेत. घराचा दरवाजा त्यांनी आतून लावून घेतला होता. त्यामुळे सकृतदर्शनही हा सामूहिक आत्महत्येचा प्रकार असावा असा पोलिसांचा कयास आहे.
पोलिसांनी घर तोडून आत प्रवेश केला तेव्हा कुटुंब प्रमुखाचा मृतदेह छताला गळफास लावून घेतल्याच्या स्थितीत आढळला, तर बाकीचे तीन मृतदेह जमीनीवरच पडलेले आढळले. पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. अद्याप घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. याप्रकरणी अद्याप कोणावरही संशय व्यक्त केला गेला नसून तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.