पाटणा – बिहार राज्यातील सारण जिल्ह्याच्या खोदाईबाग येथील फटाक्याच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटात सहा जण ठार झाले आहेत तर इतर अनेक जण जखमी झाले आहेत. एका तीन मजली इमारतीत ही फॅक्टरी होती. तेथे अचानक झालेल्या स्फोटानंतर संपुर्ण इमारतच कोसळली. त्याच्या ढिगाऱ्या खाली अनेक जण अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की तो घटनास्थळापासून दोन किमी अंतरावर ऐकू आला. याचा अर्थ त्या ठिकाणी फटाके आणि त्यासाठी लागणाऱ्या दारूचा मोठा साठा होता. इमारतीच्या ढिगाऱ्या खालूनही फटाके उडाल्याचे आवाज बराच काळ येत राहिले होते.
सदर फटाका फॅक्टरी बेकायदेशीर होती असे पोलिसांनी सांगितले. तेथे फटाक्याबरोबरच काही गॅस सिलिंडरचेही स्फोट झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. इमारतीचा ढिगारा पुर्ण उपसल्यानंतरच तेथे आणखी कोणी अडकले आहे काय याची माहिती मिळू शकेल असे पोलिसांनी सांगितले.