कोलंबो : श्रीलंकेत नागरिकांनी सरकारविरोधात मोठे रान उठावले आहे. देशातीलआंदोलनकर्त्यांनी देशाच्याराष्ट्रपतींच्या निवासस्थानावर कब्जा केला आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबाला लोकांच्या रागाला सामोरे जावे लागत आहे. त्याचाच अनुभव राष्ट्रपती गोटाबाया यांचा लहान भाऊ बासिल राजपक्षे यांनाहीआला. श्रीलंका सोडून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या बासिल यांना विमानतळ कर्मचाऱ्यांनीच रोखले असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे भाऊ बासिल राजपक्षे हे कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. बासिल हे देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, विमानतळावर इमीग्रेशन कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला. विमानतळ कर्मचारी युनियनने बासिल राजपक्षे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
बासिल राजपक्षे ‘रेशीम मार्गा’चा वापर करून श्रीलंकेबाहेर जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, इमिग्रेसन कर्मचारी आणि युनियनने रात्रीच कामबंद आंदोलन केले. घोषणाबाजीनंतर बासिल राजपक्षे यांना माघारी जावे लागले.
बासिल राजपक्षे हे श्रीलंकेचे माजी अर्थमंत्री आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. श्रीलंकेत राजपक्षे कुटुंबीयांतील अनेकजण सरकारमध्ये सहभागी होते. अनेकांकडे महत्त्वाची खाती होती. श्रीलंकेतील आर्थिक संकटासाठी राजपक्षे जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राष्ट्रपती गोटाबाया हे देश सोडून गेले असल्याचे म्हटले जात आहे. तर, गोटाबाया अद्यापही देशात असल्याचा दावा सरकारी यंत्रणांकडून करण्यात आला आहे.