मुंबई – प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला होता. सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतल्यानंतर गँगस्टर बिश्नोईने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला लक्ष्य केले होते. गेल्या महिन्यात, सलमान खानचे वडील अभिनेता सलीम खान यांना मॉर्निंग वॉक दरम्यान धमकीचे पत्र मिळाले होते. यानंतर इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती.
आता पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला उघड इशारा दिला आहे. वास्तविक, हा इशारा २४ वर्षांच्या काळवीट प्रकरणाबाबत आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या तुरुंगात असला तरी त्याच्याशी संबंधित अपडेट्स सातत्याने समोर येत आहेत.ज्यानुसार त्याने पुन्हा सलमानला इशारा दिल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली आहे. ज्यात त्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, काळवीट मारल्याबद्दल आमचा समुदाय सलमानला कधीही माफ करणार नाही. याशिवाय गँगस्टरने सलमानकडे जाहीर माफी मागण्याची मागणी केल्याचेही वृत्त समोर आलं आहे.
सलमानचे वकील हस्तीमल सारस्वत यांनाही धमक्या
इतकेच नाही तर गेल्या महिन्यात सलीम खानला मिळालेल्या धमकीच्या पत्रात सलमानला ठार मारण्याबाबत लिहिले होते. यानंतर सलमानचे वकील हस्तीमल सारस्वत यांनाही लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी देण्यात आली होती. धमकीच्या पत्रात सारस्वतांना लिहिले की, शत्रूचा मित्र हा शत्रू असतो. कुणालाही सोडले जाणार नाही. तुमच्या कुटुंबालाही सोडले जाणार नाही, असे या पत्रात स्पष्ट लिहिले होते. लवकरच तुमचीही सिद्धू मुसेवालासारखीच अवस्था होणार असल्याचा उल्लेख देखील या पत्रात करण्यात आला होता.