बर्मिंगहॅम – हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू खेळाने पहिला सामना जिंकलेला भारतीय संघ (टीम इंडिया) यजमान इंग्लंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील आज येथे होत असलेला दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेण्यासाठी सज्ज बनला आहे.
दुसरा टी-20 सामना
वेळ – संध्याकाळी 7 वाजल्यापासून
ठिकाण – एजबस्टन, बर्मिंगहॅम
थेट प्रक्षेपण – सोनी स्पोर्टस नेटवर्क
दुसरा सामना येथील एजबस्टन मैदानावर होत असून या सामन्यात विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत हे पहिल्या सामन्यात विश्रांती घेतलेले खेळाडू संघात परतणार असून त्यामुळे भारताची ताकद वाढणार आहे. इंग्लंडच्या फलंदाजांवर पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दडपण राखण्यात यश मिळवले असले तरीही त्यांचा सलामीवीर कर्णधार जोस बटलरला लवकर बाद करण्यासाठी भारताला नव्या योजना आखाव्या लागणार आहेत.
बटलरने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा व शतके फटकावली होती, त्यामुळे एखाद्या सामन्यातील अपयश त्यालाही सलत असेल. त्यामुळे तो या सामन्यात भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच आक्रमक करण्याच्या तयारीत राहील.
भारतीय संघ या मालिकेत समतोल वाटत असून पहिल्या सामन्यातील विजयामुळे कसोटीतील पराभव मागे टाकत त्यांनी आत्मविश्वास मिळवला असल्याचेच दिसून आले. आता सलामीला कर्मधार रोहित शर्मा व इशान किशन यांनी भक्कम सलामी दिली तर याही सामन्यात इंग्लंडसमोर मोठे आव्हान ठेवता येणार आहे.