लंडन – भारताचा महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने क्रोएसियाचा सहकारी खेळाडू मॅट पेविकसह खेळताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या जोडीने उपांत्यपूर्वी फेरीच्या लढतीत कॅनडाच्या गॅब्रीयला दाब्रोव्हस्की व ऑस्ट्रेलियाचा जॉन पीर्स या जोडीवर 6-4, 3-6, 7-5 असा तीन सेटमध्ये पराभव केला.
केवळ 41 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सानिया व पेविकने पहिला सेट जिंकत थाटात सुरुवात केली होती. मात्र, दाब्रोव्हस्की व पीर्स जोडीने दुसरा सेट जिंकत बरोबरी साधली होती. मात्र, तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये पुन्हा एकदा सानिया व पोविकने अफलातून खेळ केला. त्यांनी आपल्या सर्व्हिस तर राखल्याच मात्र दाब्रोव्हस्की व पीर्स यांच्या सर्व्हिसवरही गुण मिळवले.
सानियाला यापूर्वी कधीही या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत उपांत्य फेरी गाठता आलेली नव्हती. 2011, 2013 व 2015 साली तिला उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदाच्या मोसमानंतर निवृत्त होणार असल्याचे सानियाने काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते, त्यामुळे आता यंदाच्या मोसमात किमान मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवत थाटात निवृत्ती घेण्यासाठी ती जिद्दीने खेळत आहे.