लंडन – ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या विम्बल्डन या अत्यंत मानाच्या समजल्या जात असलेल्या स्पर्धेत यंदाच्या मोसमात ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिऑसने प्रेक्षकांशी केलेल्या गैरवर्तनाने स्पर्धेला गालबोट लागले. सामन्यात झालेल्या चुकांमुळे संतापलेल्या किर्गिऑसने प्रेक्षकांच्या दिशेने गैरवर्तन केले व चक्क त्यांच्याकडे पाहत थुंकला. त्याच्यावर कठोर कारवाईही करण्यात आली. मात्र, त्याबद्दल दिलगिरी तर त्याने व्यक्त केलीच नाही, पण मला झालेला आर्थिक दंड मी भरला असून आता तो समाजोपयोगी कामांसाठी खर्च होईल, असे सांगत आपली मस्ती अद्याप कायम असल्याचेच दाखवून दिले.
गैरवर्तन केल्याबद्दल त्याला 10 हजार डॉलर्स म्हणजे (जवळपास 8 लाख रुपये) दंड भरावा लागला. हा या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड ठरला आहे.
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने याबाबत कबुली दिली. मात्र, दंड झाल्याबद्दल त्याला अजिबात वाईट वाटले नाही.आतापर्यंतच्या कारकिर्दीत तब्बल 6.3 कोटी रुपये दंड म्हणून भरले असून, ही सर्व रक्कम आता धर्मादाय म्हणून वापरली जाईल, असे बोलत आपली मस्ती अद्याप कायम असल्याचेच त्याने दाखवून दिले.
त्याच्या या वक्तव्यानंतर स्पर्धेचे आयोजक असलेल्या ऑल इंग्लंड टेनिस क्लबने नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, त्याचवेळी अशी कृती त्याच्याकडून पुन्हा घडली तर यापेक्षाही कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही संकेत दिले आहेत.