सातारा -राज्यातील सत्ता बदलानंतर सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. पाटणचे आ. शंभूराज देसाई व साताऱ्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मंत्रिमंडळात सहभाग झाल्यास या दोघांमध्ये पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच होईल, अशी चर्चा आताच सुरू झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्र्यांना दुय्यम अधिकार असल्याची खंत करून शंभूराज देसाई यांनी आपल्या व्यथांना मोकळी वाट करून दिली होती. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत ते त्यांच्याबरोबर सामील झाल्याने त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळावे, अशी देसाई व त्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामागे भाजपची संपूर्ण ताकद उभी करू आणि त्यांना जबाबदारीचे पद देऊ, असा शब्द तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यामुळे त्यांचाही समावेश मंत्रिमंडळात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्याला एक कॅबिनेटसह दोन राज्यमंत्रिपदे किंवा दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद मिळावे ही अपेक्षा व्यक्त होत आहे. शंभूराज व शिंवेंद्रसिंहराजे यांच्याबरोबरच माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यामागे ताकद उभी करण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यामुळे त्यांना कोणते पद दिले जाणार याबाबत याची चर्चा आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात साताऱ्याच्या नेतृत्वाला मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे