नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मिरमध्ये सध्या काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर पूर्णपणे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता जम्मू आणि काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. दहशतवाद्यांनी एका पोलिसाची त्याच्याच घरात घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी पोलीस उपनिरीक्षकाच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये पोलीस निरीक्षक फारूख अहमद मीर यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी फारूख अहमद मीर यांच्या घरातून त्यांचे अपहरण करून यानंतर शेतात नेऊन त्यांच्यावर गोळीबार केला. ही घटना रात्री उशिरा घडल्याची माहिती समोर आली आहे.
J&K | Bullet-riddled body of Police Sub Inspector Farooq Ah Mir found in paddy fields near his home. Visuals from his native place
Police say, "Preliminary investigation reveals he had left his home for work in his paddy fields last evening, where he was shot dead by terrorists" pic.twitter.com/eEL6hqA2up
— ANI (@ANI) June 18, 2022
या घटनेमागे कोणत्या संघटनेचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा टार्गेट किलिंगचा मुद्दा समोर आला आहे. कारण गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी अशाच प्रकारे अनेक नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली होती. मात्र आता एका उपनिरीक्षकाच्या हत्येनंतर पोलीस आणि लष्करासमोरील आव्हान आणखी वाढलं आहे.
यापूर्वी 07 मे रोजी जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी एका पोलिसाला गोळ्या घालून जखमी केलं होते. या घटनेबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या कॉन्स्टेबलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर 13 मे रोजी दहशतवाद्यांनी रियाझ अहमद नावाच्या जवानाची हत्या केली होती. मात्र, रविवारी झालेल्या चकमकीत रियाझच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यासह तिघांना सुरक्षा दलांनी ठार केलं. त्यांच्याकडून शस्त्रंही जप्त करण्यात आली आहेत.