बॅंकॉक – थायलंडने गांजाचा वापर निर्बंध मुक्त जाहीर केला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारा थायलंड हा अशियातील पहिला देश ठरला आहे. थायलंडचे आरोग्य मंत्री अनुतिन चर्नविराकुल यांनी सांगितले की, कायदेशीर गांजाच्या उत्पादनामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे; मात्र त्याचा मनोरंजनात्मक वापर करण्यास बंदी कायम असणार आहे.
सरकारच्या नवीन निर्णयानुसार गांजा आणि भांग उत्पादने वाढवणे आणि त्यांचा व्यापार करणे किंवा आजारांवर उपचार करण्यासाठी वनस्पतीचे काही भाग वापरणे यापुढे गुन्हा ठरणार नाही. कॅफे आणि रेस्टॉरंट्स देखील भांग-मिश्रित अन्न आणि पेय देऊ शकतात तथापि त्याच्या वापराचे एक विशिष्ट प्रमाण ठरवून देण्यात आले आहे.
ज्याचा भंग केल्यास मात्र त्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. वैद्यकीय हेतूंसाठी आणि आरोग्यासाठी भांग काढणे आणि कच्चा माल वापरण्यावर आम्ही यानिमीत्ताने अनुमती दिली आहे असे मंत्री म्हणाले. सार्वजनिक ठिकाणी एकत्र बसून गांजाचा वापर करण्यास बंदी असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.