परळी : गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्यावरुन चर्चांना उधाण आले होते. मात्र भाजपाने दोन्ही राज्यसभा उमेदवारांची नावे घोषित केल्याने या चर्चेला पूर्मविराम मिळाला. राज्यसभेचा विषय संपल्यानंतर आता राज्यात विधानपरिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार का? याविषयीचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
पंकजा मुडे यांना विधानपरिषदेवर संधी मिळावी, दिल्लीमध्ये मंत्रिपद मिळावं असं अनेकांना वाटतं. तुमच्या समर्थकांची ही इच्छा तीव्र झालेली आहे. त्यावर आपले काय मत आहे, असे विचारले असता “माझ्याविषयी लोकांची इच्छा हीच माझी शक्ती आहे. सध्या नावे अनेक चर्चेत आहेत. पक्ष काय निर्णय घेईल ते कळेच. काही फार लांब नाहीये. लवकरच समजेल. तेव्हाचं तेव्हा पाहू” अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली.
पक्षाने तुम्हाला संधी दिली नाही कि तुम्हाला ती मिळत नाही, असा सवाल पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला असता “मी कुठल्या संधीची अपेक्षा करत नाही. कुठल्या संधीसाठी मी प्रयत्नही करत नाही. संधी मिळावी यासाठी वाट पाहणाऱ्या राजकारण्यांमध्ये माझा नंबर नाही. जे मिळते त्याची संधी करुन दाखवणे, संधीचे सोने करुन दाखवणे हे माझं काम आहे. हे माझे संस्कार आहेत. गोपीनाथ मुंडे यांनी जी पदं भुषवली त्या पदाला त्यांनी आणखी मोठं केलं. संधीसाठी रांगेत वाट पाहतेय, ही माझी प्रवृत्ती नाही,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, आज भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदीन आहे. यानिमित्त बीड जिल्ह्यातील गोपीनाथ गडावर संघर्ष दीन सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित राहणार आहेत. यावर बोलताना, “शिवराजसिंह आज महाराष्ट्रात येत आहेत. ओबीसीसाठी, वंचितांसाठी आयुष्य खर्च करणाऱ्या नेत्याच्या समाधीस्थळावर ओबीसींना सुरक्षा देणारा नेता येतोय. ओबीसींचं भविष्य रेखाटण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्य खर्ची घातलं. शिवराजसिंह ओबीसींचं भविष्य सुरक्षित करणारे नेते आहेत. त्यामुळे आम्ही शिवराज यांचं विशेष सन्मान करणार आहोत,” अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.