मुंबई : महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती या नात्याने उच्च शिक्षण क्षेत्रात आईसलँडशी सहकार्य करण्यास महाराष्ट्राला निश्चितच आवडेल तसेच आईसलँड येथील विद्यापीठांमधील अध्यापकांनी राज्यातील विद्यापीठांना भेट द्यावी, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व्यक्त केली.
आईसलँडचे भारतातील राजदूत गुडनी ब्रॅगसन यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते. या भेटीदरम्यान, आईसलँडचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत गुल कृपलानी हे देखील उपस्थित होते.
भारत आणि आईसलँड भूऔष्णिक ऊर्जा निर्मिती या विषयावर सहकार्य करीत असून या संदर्भात टास्क फोर्स देखील नेमण्यात आला असल्याचे, राजदूत गुडनी ब्रॅगसन यांनी सांगितले. भारतातील विविध वैज्ञानिक संस्थांना देखील आपण भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ ऊर्जा क्षेत्राशिवाय आईसलँड भारताशी सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
आईसलँड येथे भारतीय योग लोकप्रिय असून आपल्या देशाला योग प्रशिक्षकांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. आईसलँड येथील विद्यापीठात हिंदी विषयाचे अध्यापन सुरु झाले असल्याचे राजदूत गुडनी ब्रॅगसन यांनी यावेळी सांगितले.