मद्रिद, – कतारच्या माजी राजकन्या कासिया गालानिओ या स्पेनमध्ये आपल्या घरात मृतावस्थेत आढळल्या आहेत. घरी शयनकक्षात त्या मृतावस्थेत आढळून आल्या आहेत. स्पेनच्या पोलिसांनी ही माहिती दिली. कासिया गालानिओ या 46 वर्षांच्या होत्या. स्पेनमधील मारबेला येथील अपार्टमेंटमध्ये त्या मृतावस्थेत आढळून आल्या, असे पोलिसांच्या प्रवक्त्या महिलेने सांगितले.
गलानिओ यांची फ्रान्समध्ये असलेली कन्या त्यांना फोन करत होती. मात्र त्या फोन उचलत नसल्यामुळे पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. गालानिओ यांच्या कन्येने संपर्क केल्यानंतर पोलीस गालानिओ यांच्या घरी पोचले. रखवालदाराच्या मदतीने पोलिसांनी घराचे दरवाजे उघडले. तेंव्हा गालानिओ या पलंगावर मृतावस्थेत आढळून आल्या. तेथे हिंसेची कोणतीही चिन्हे आढळून आली नाहीत. त्यामुळे गालानिओ यांच्या मृत्यूमागे घातपाताचे कोणतेही कारण नसावे, असा अंदाज आहे.
गालानिओ यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी शवविच्छेदन करणे अपरिहार्य आहे. त्यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व होते. गालानिओ यांचा विवाह कतारच्या अमीरांचे 73 वर्षीय काका अब्देलअझिझ बिन खलिफा अल थानी यांच्याबरोबर झाला होता.
या दाम्पत्याला 3 अपत्ये होती. गालानिओ यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीवर एका अपत्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांच्या पतीने हे आरोप फेटाळून लावले होते. त्यांची मुले आपल्या वडिलांबरोबर पॅरिसमध्ये रहातात, असे फ्रान्सच्या वर्तमानपत्राने म्हटले आहे.