चंदीगड – पंजाब सरकारने राज्यातील 424 जणांना देण्यात आलेली सरकारी सुरक्षा काढून घेतली आहे. त्यात अनेक आजी माजी आमदार, शिखांच्या दोन तख्तांचे दोन जथेदार, काही डेरांचे प्रमुख आणि काही माजी पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ही सुरक्षा सध्या तात्पुरत्या स्वरूपात काढून घेण्यात आली असून कायद्यानुसार संबंधीत व्यक्तींना असलेला धोका लक्षात घेऊन त्यासंबंधी नंतर फेर आढावा घेतला जाईल अशी माहिती राज्याच्या अतिरीक्त पोलिस महासंचालकांनी दिली.
शिखांचे सर्वोच्च धार्मिक पीठ समजल्या जाणाऱ्या अकाल तख्ताचे प्रमुख ग्यानी हरप्रितसिंग यांचीही सुरक्षा यात काढून घेण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंजाबातील अनेक धर्मपीठांचे प्रमुख सरकारी सुरक्षेत वावरत होते. आता त्यांना सुरक्षेशिवायच सर्वत्र येजा करावी लागणार आहे.
काही विद्यमान आमदारांचीही सुरक्षा काढून घेण्यात आली असून त्यात अकालीदलाच्या आमदार गनिवीकौर मजिठिया, कॉंग्रेस आमदार परगट सिंग, आम आदमी पक्षाचे लुधियाना येथील आमदार मदनलाल बग्गा यांचाही समावेश आहे.