बंगळुरू – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्याविरुद्ध कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. आयकर विभागाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने नोंदवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवकुमार सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्याचवेळी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर डीके शिवकुमार म्हणाले की, माझा कायद्यावर विश्वास आहे. मला माहित आहे की मला न्याय मिळेल. या सर्व कारवाया राजकीय हेतूने प्रेरित आहेत.
2018 चे प्रकरण –
फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने सप्टेंबर 2018 मध्ये शिवकुमार, ए हौमंथैया, नवी दिल्लीतील कर्नाटक भवनचे कर्मचारी आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. हा खटला आयकर विभागाने शिवकुमार आणि इतरांविरुद्ध बंगळुरूच्या न्यायालयात कथित करचोरी आणि हवाला व्यवहारांसाठी दाखल केलेल्या आरोपपत्रावर आधारित होता.
काय आहेत आरोप?
आयकर विभागाने शिवकुमार आणि त्यांचे सहकारी एसके शर्मा यांच्यावर तीन अन्य आरोपींच्या मदतीने हवाला चॅनेलद्वारे नियमितपणे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड वाहतूक केल्याचा आरोप केला आहे. 60 वर्षीय शिवकुमार यांना 2019 मध्ये ईडीने या प्रकरणात अटक केली होती आणि एजन्सीने त्यांची मुलगी ऐश्वर्या आणि काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक लोक आणि सहयोगींची चौकशी केली होती.