सिंहगडरस्ता – वडगाव बुदृक सेवा रस्त्यालगत वेश्याव्यवसाय खुलेआम सुरू असल्याबाबतच्या तक्रारी स्थानिक नगारिकांनी पोलीस ठाण्यात वेळोवेळी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलीस आयुक्तांनीच लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी परिसरातील महिलांकडून करण्यात आली आहे.
मुंबई-बंगळुरू महामार्गालगत वडगांव बुद्रुक येथील सेवा रस्त्यालगत अनेक बार व लॉजिंग असल्याने ग्राहक शोधण्यासाठी देहविक्री करणाऱ्या महिला दिवसाभर तसेच रात्री उशीरापर्यंत उभ्या असतात. त्यामुळे स्थानिक महिलांचीही या रस्त्याने जाता-येता कुचंबणा होत आहे. याबाबत स्थानिकांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यांनतरही हा “धंदा’ बंद झालेला नाही. पोलीस फक्त “बघ्याची’ भूमिका घेत असल्याने या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या “कस्टमर’ची गर्दी होत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनाही घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.
नवले पुल परिसरात रात्री सेवा रस्त्याच्या बाजूला तृतीयपंथी उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना हातवारे करून बळजबरी थांबवण्याचा प्रयत्न करतात. सहयोग नगर, नारायण बाग परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याला चाप बसावा म्हणून पोलीस प्रशासन ठोस कारवाई करणे गरजेचे असताना पोलिसांनी याबाबत अद्यापपर्यंत कोणतीच ठोस भूमिका घेतलेली नाही. पण, मग का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत देहविक्री करणाऱ्या महिलांच्या विरोधात पोलिसांकडून दोन महिन्यांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा वेश्या व्यवसाय खुलेआम सुरू झाला आहे. त्यामुळे कधीकाळी “सिंघम’ म्हणून ओळख असलेल्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत साई सेवा ट्रस्टच्यावतीने सिंहगड रस्ता पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
वडगाव बुद्रुक येथील सेवा रस्त्यालगत देहविक्री करणाऱ्या महिला कायमच उभ्या असतात. त्यामुळे शेजारील असणाऱ्या सोसायट्यांमधील स्थानिक महिलांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून हा प्रकार कायमचा बंद करावा, अन्यथा स्थानिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– हरिदास चरवड, माजी नगरसेवक