कात्रज – कात्रज-कोंढवा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अखेर पथविभागाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. भूसंपदनाअभावी रुंदीकरण संथगतीने सुरू आहे. मात्र, सध्याचा वापरातील रस्त्याची खड्डे व साइड पट्ट्याची दुरवस्था झाल्याने डांबरीकरण करण्याची मागणी होत होती, त्यामुळे पथ विभागाच्या वतीने डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून नागरिकांसह वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
विकास आराखड्यातील 84 मीटर कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम जागा हस्तांतरण अभावी रखडले आहे. मुळात अरुंद रस्त्यावर जड व इतर वाहनांची वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे नित्याची वाहतूक कोंडी व अपघातांची मालिका सुरू आहे.
मनपा बांधकाम विकास विभाग झोन-2च्या वतीने कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अतिक्रमानावर धडक कारवाई करतना रस्ता अतिक्रमण मुक्त केला.मात्र, बाधित जागा मालकांनी योग्य मोबदला मिळाला नसल्याने जागा ताब्यात दिल्या नाहीत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा अडथळा दूर झाला नाही.
मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे व साइड पट्यांची दुरवस्था झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे वापरातील रस्त्याचे व ताब्यात आलेल्या जागेवर डांबरीकरण करण्याची मागणी कात्रज-कोंढवा रोड नागरी संघर्ष समितीच्या वतीने समन्वयक संतोष धुमाळ व मंगेश भगत यांनी मनपा प्रशासनाकडे केली होती. त्याची दखल घेत सदर काम सुरू करण्यात आले आहे.
कात्रज-कोंढवा वापरातील रस्त्यावर डांबरीकरण सुरू केले असून, खडी मशीन ते शत्रूंजय मंदिर पहिला टप्पा पूर्णत्वाकडे आला आहे. शत्रूंजय मंदिर ते राजस सोसायटी दुसऱ्या टप्यास सुरुवात केली असून पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण केले जाईल.
– धनंजय गायकवाड, उपअभियंता पथ