मुंबई : देशभरात चर्चिला जाणारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरेयांनी स्वतः ट्विट करत याविषयीची माहिती दिली आहे. राज ठाकरे यांची तब्बेत ठीक नसल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यातील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचे देखील राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे हे अचानक पुणे दौऱ्यावर मुंबईला परतले होते. त्यामुळे त्यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल चर्चांना उधाण आले होते. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम देत राज यांनी दौरा स्थगित केला असल्याचे सांगितले आहे.
#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022
राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली असून त्याची शस्त्रक्रिया करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. राज ठाकरे हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मनसैनिकांकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारीही सुरु झाली होती. त्यांच्या या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधून कडाडून विरोध करण्यात आला होता. तरीदेखील राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. परंतु, आता मात्र प्रकृती अस्वास्थामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आले आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच त्यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा तीव्र विरोध आहे. तसेच मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध केला होता.