पुणे , {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापनेच्या आधीपासून पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत असलेले पुण्यातील फायरब्रँड नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मोरे यांनी आपले राजीनामापत्र सोशल मीडियावर शेअर करत पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती त्यांनी राज ठाकरे यांना केली आहे.
मोरे यांनी दिलेला राजीनामा पुण्यात मनसेसाठी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे पुण्यात केवळ दोन नगरसेवक निवडून आले होते. त्यात मोरे आणि विद्यमान शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचा समावेश आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मोरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आले होते.
गेल्या काही वर्षांपासून वसंत मोरे पक्षावर नाराज होते. अनेकदा त्यांनी आपली नाराजी राज ठाकरे यांच्याकडेही व्यक्त केली. त्यानंतर अचानक त्यांचे शहराध्यक्षपद काढून घेण्यात आले. त्यानंतरही मोरे यांनी आपली नाराजी थेट व्यक्त केली नसली, तरी पक्षांच्या बैठका तसेच ठाकरेंच्या कार्यक्रमांना त्यांनी दांडी मारली होती. त्यानंतर स्वत: राज ठाकरे यांनी पुन्हा त्यांची समजूत काढत त्यांची नाराजी दूर केली होती.
तर, काही दिवसांपूर्वीच मोरे यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार असल्याची घोषणाही केली होती. मात्र, त्याच वेळी पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने डावलले जात असल्याचा ते आरोप करत होते. दरम्यान, वसंत मोरे यांनी मंगळवारी मध्यरात्री फेसबुक पोस्ट लिहिली होती. “एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही,’ असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी थेट राजीनामा दिला आहे
मी पक्षाच्या प्राथमिक सदस्य तसेच इतर पदांचा राजीनामा दिला आहे. मी तूर्तास कोणत्याही पक्षात जाणार नाही. पुढील दोन ते तीन दिवसांत मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेल. तूर्तास मी मनसेचा राजीनामा दिलेला आहे. – वसंत मोरे, माजी नगरसेवक