चंद्रपुर – पेट्रोल टँकर व लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर पेट्रोलच्या टँकरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांची पथके व अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. बचाव कार्य व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. हा अपघात चंद्रपूर शहराजवळीत मूल मार्गावरच्या अजयपूर गावाजवळ झाला आहे.
चंद्रपुरात पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, स्फोटात 6 जणांचा होरपळून मृत्यू #accident #chandrapur pic.twitter.com/qYx1L15H1L
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) May 20, 2022
या अपघातासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर व लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या धडकेमुळे ट्रकला आग लागली दरम्यान आगीमुळे ट्रकचे टायर फुटले त्यामुळे आग आणखीच भडकली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक खंडित झाली. आगीच्या उंच ज्वाळांनी लगतच्या जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात सापडली.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच मूल-चंद्रपूर येथून अग्निशमन पथके रवाना करण्यात आली. मूल-रामनगर पोलिसांची पथके, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.