पुणे –राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी आणि पोलिसांना मदत म्हणून “एएमबीआयएस’ अर्थात “ऑटोमोटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम’ महत्त्वाची भूमिका पार पडणार आहे. ही यंत्रणा पोलीस ठाणे स्तरापर्यंत राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या यंत्रणेअंतर्गत सुमारे 6.5 लाख अटक व शिक्षाप्राप्त आरोपीचा अभिलेख संगणकीकृत करण्यात आलेला आहे. दरम्यान, सन 2020 ते एप्रिल 2022 पर्यंत प्रायोगिक तत्त्वावरील परीक्षणात या प्रणालीवर 2.14 कोटींच्या चोरीस गेलेल्या मालमत्तेच्या 52 केसमध्ये आरोपींचा शोध लावण्यात आला.
पूर्वी गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशावरून आरोपीची ओळख पटवली जात होती. मात्र आता हाताचे तळवे, सीसीटीव्ही फुटेजमधील चेहरा व छायाचित्रावरुनही गुन्हेगारांची ओळख पटविण्यात येणार आहे. या प्रणालीत आरोपींच्या अंगुली मुद्रा पत्रिका, तळहाताचे ठसे, चेहरा व डोळ्यांची बुबुळे हे डिजिटल स्वरुपात जतन करुन ते अभिलेखाशी जुळविण्याची क्षमता आहे. आता पोलीस ठाण्यातही यंत्रणा असणार आहे. ही प्रणाली भविष्यात सीसीटीएनएस, प्रिझम, सीसीटीव्ही व राष्ट्रीय स्तरावरील एनएएफआयएस या प्रणालीशी जोडण्यात येणार आहे. राज्यातील सर्व पोलीस विभागांना एएमबीआयएस प्रणालीचे सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. ही प्रणाली प्रगत असून, तिची गती व अचूक असेल.
गुन्हेगाराचा पूर्वइतिहास एका क्लिकमध्ये
अटक आरोपीच्या अंगुली मुद्रा पत्रिकेची ऑनलाइन नोंदणी करून त्यांचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा पूर्व इतिहास तपासण्यासाठी व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी या संगणकीय यंत्रणेचा उपयोग होणार आहे. “एएमबीआयएस’ प्रणालीतंर्गत देण्यात येणाऱ्या पोर्टेबल “एएमबीआयएस’ या यंत्रणेचा वापर करून गुन्ह्यांच्या घटनास्थळी मिळालेल्या चान्सप्रिटद्वारे गुन्हेगारांचा शोध घेणे काही मिनिटांतच शक्य झाले आहे. त्यामुळे गुन्हे उघडकीचे प्रमाणात वाढ होणार आहे.