लंडन – जागतिक फुटबॉलमध्ये 1986 साली इंग्लंडविरुद्धच्या झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचा महान खेळाडू दिएगो मॅराडोना याने वापरलेली जर्सी विक्रमी किमतीत विक्री झाली. हॅंड ऑफ गॉड अशा नावाने विख्यात असलेल्या या जर्सीला तब्बल 7.1 मिलियन पाऊंड (जवळपास 68 कोटी रुपये) मिळाले.
क्रीडा विश्वात जर्सीच्या लिलावात सर्वाधिक रक्कम मिळवण्याचा विक्रम मॅराडोना यांच्या या जर्सीने केला आहे. यासाठीचा लिलाव नुकताच संपन्न झाला. याच सामन्यात हॅंड ऑफ गॉड हा वादग्रस्त गोल झाला होता.
1986 सालच्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात मॅराडोना हेडरद्वारे गोल करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, बॉल त्याच्या हाताला लागला आणि गोल पोस्टमध्ये गेला. मॅच रेफरीला ही गोष्ट दिसली नाही. हाच गोल पुढे हॅंड ऑफ गॉड नावाने संबोधला जाऊ लागला.
उपांत्यपूर्व सामन्यात अर्जेंटिनाने इंग्लंडला 2-1 असे पराभूत करत उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य सामन्यात बेल्जियमचा तर अंतिम सामन्यात वेस्ट जर्मनीचा पराभव करत विजेतेपद मिळवले.