मुंबई -भारताचे महान क्रिकेटपटू कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारताने 1983 साली एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद जिंकले होते. याच विजेतेपदाच्या डीजीटल स्वरुपातील चषकाचा नुकताच लिलाव करण्यात आला. त्याला तब्बल 82 लाख रुपयांत खरेदी केले गेले.
ऑगमेंटेड रिऍलिटी क्रिकेट एनएफटी प्लॅटफॉर्म क्रिकफ्लिक्सचा एका सोहळ्यात शुभारंभ झाला. याच सोहळ्यात विविध ऐतिहासिक क्षणांचे पुरस्कार, सन्मानचिन्हे, चषक व बक्षिसांचा डीजीटल स्वरुपात लिलाव करण्यात आला. पहिल्या तासाभरातच तब्बल 1.38 कोटी रुपये किंमतीच्या वस्तुंची विक्री करण्यात आली.
यात भारतीय क्रिकेट संघाच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या विजेतेपदाच्या चषकाची खरेदी एहसान मोराबेझ या व्यक्तीने केली. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा ऑफ स्पीन गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याच्या कारकीर्दीतील अखेरच्या कसोटीत वापरण्यात आलेल्या चेंडूलाही 30 लाख रुपयांत खरेदी केले गेले.
1983 सालच्या चषकाचे डीजीटल स्वरुप चांदीमध्ये तयार करण्यात आले होते. त्यावर हिऱ्यांचे नक्षिकामही केले होते. त्याचबरोबर विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय संघाच्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेल्या टी-शर्टलाही लाख मोलाचा भाव मिळाला. क्रिकफ्लिक्सद्वारे कोणत्याही कलाकृती किंवा ऐतिहासिक गोष्टींचे डिजिटल स्वरूप तयार करते.