काबुल : अफगाणिस्तानवर तालिबान बंडखोरांनी पूर्णपणे कब्जा केला आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सत्ता हस्तांतराबाबत चर्चा करण्यासाठी तालिबानचे मध्यस्थ रविवारी अध्यक्षीय राजवाड्यात पोहोचले. सरकारच्या बाजूने माजी अध्यक्ष हमीद करझई आणि अफगाण राष्ट्रीय सलोखा परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला वाटाघाटी करणार आहेत.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी आपण देश का सोडला यासंदर्भात रात्री उशिरा सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. दुसरीकडे अफगाणच्या संरक्षण मंत्र्यांनी आता अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट येण्यामागे राष्ट्राध्यक्ष जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केलाय.
دست ما را از پشت بستند و وطن را فروختند لعنت به غنی و دار دسته اش.
— General Bismillah Mohammadi (@Muham_madi1) August 15, 2021
अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री जनरल बिस्मिल्ला मोहम्मदी यांनी ट्विटरवरुन थेट नाव न घेता राष्ट्राध्यक्ष अशरफ घानी आणि त्यांच्या धोरणांवर मोजक्या शब्दात टीका केलीय. “त्यांनी आमचे हात पाठीमागे बांधून ठेवले आणि मातृभूमी विकली. त्या श्रीमंत व्यक्तीचा (राष्ट्राध्यश्र घनी) आणि त्याच्या गटाचा धिक्कार असो,” असे ट्विट मोहम्मदी यांनी केले आहे.
अगदी सायंकाळपर्यंत मोहम्मदी यांना काबूल लढेल असा विश्वास असल्याचे त्यांच्या या पूर्वीच्या ट्विटमधून पहायला मिळाले. काबूलमधील सन्माननिय आणि धार्मिक व्यक्तींना मी अफगाण संरक्षण आणि सुरक्षा दलांच्या वतीने सांगू इच्छीतो की, “काबूलच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतलीय. काबूलच्या संरक्षणासाठी तुमचे सुरक्षा दल आणि संरक्षण फौजा कटीबद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय तुकड्या आपल्या संरक्षण आणि सुरक्षा दलांना मदत करण्यासाठी तयार आहेत,” असे ट्विटही काबूलवर तालिबान्यांनी कब्जा मिळवण्याच्या आधी रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारस मोहम्मदी यांनी केलं.
मात्र सायंकाळी राष्ट्राध्यक्ष घनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत देश सोडून पळून गेल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर काबूलवर तालिबानने ताबा मिळवल्याचे जवळजवळ निश्चित झाले. पुढील काही तासांमध्ये शहरामधील जवळजवळ सर्वच कार्यालये आणि अध्यक्षीय प्रासादावर तालिबानने ताबा मिळवला. त्यामुळेच संरक्षणमंत्र्यांनी राष्ट्राध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत.