नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 मेपासून जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते 25 कार्यक्रमांना हजेरी लावतील आणि तीन दिवसांच्या भेटीदरम्यान ते त्या देशांमध्ये सुमारे 65 तास घालवतील. पंतप्रधान मोदींचा या वर्षातील पहिलाच विदेश दौरा आहे. दौऱ्यावर जाण्याच्या एक दिवस आधी पीएम मोदींनी या यात्रेचा उद्देश सांगितला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझा युरोप दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा हा प्रदेश अनेक आव्हानांना तोंड देत आहे. पीएम मोदी म्हणाले की, युरोपीय भागीदारांसोबत सहकार्याची भावना मजबूत करण्याचा माझा मानस आहे. भारतातील शांतता आणि समृद्धीसाठी युरोपीयन भागीदार महत्त्वाचे भागीदार आहेत.
पंतप्रधानांनी दौऱ्याचा सांगितला उद्देश –
पंतप्रधान म्हणाले की, डेन्मार्क, आइसलँड, फिनलंड, स्वीडन आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांसोबत दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेतही सहभागी होणार आहे. या शिखर परिषदेत महामारीनंतरची आर्थिक सुधारणा, हवामान बदल, अक्षय ऊर्जा इत्यादी विषयांवर लक्ष केंद्रित केले जाईल. सहाव्या भारत-जर्मनी इंटर-गव्हर्नमेंटल कन्सल्टेशन्स (IGC)चे ते सह-अध्यक्ष असतील. हा उपक्रम भारत केवळ जर्मनीसोबत आयोजित करतो. अनेक भारतीय मंत्रीही जर्मनीला भेट देतील आणि त्यांच्या जर्मन समकक्षांशी चर्चा करतील. पंतप्रधान पुढे म्हणाले, बर्लिनच्या माझ्या भेटीमध्ये चांसलर स्कोल्झ यांच्याशी तपशीलवार द्विपक्षीय चर्चा करण्यावर भर असेल.
मायदेशी परतण्यापूर्वी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचीही घेणार भेट –
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात परतण्यापूर्वी मी माझे मित्र आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचीही भेट घेणार आहे. या भेटीत भारत-फ्रेंच धोरणात्मक भागीदारीच्या पुढील टप्प्याची रूपरेषा तयार करण्याची संधी मिळेल.
पंतप्रधान मोदी जगभरातील 50 व्यावसायिकांशी साधणार संवाद –
आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी सात देशांतील आठ नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठका घेणार आहेत. याशिवाय 50 जागतिक व्यावसायिकांशीही ते संवाद साधतील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान मोदी आज रात्री कॅनडामध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.