अहमदाबाद – ‘आप’चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी गुजरातमधील भरूच येथे आदिवासी संकल्प महासंमेलनात भाग घेतला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप आणि काँग्रेस पक्ष फक्त श्रीमंतांना श्रीमंत करत आहेत, पण तुम्ही आम्हाला एक संधी द्या, आम्ही तुमची गरिबी दूर करू. आम्ही तुमच्या पाठीशी उभे असून ‘आप’ गरीब आणि सर्वसामान्यांचा पक्ष असल्याचे केजरीवाल म्हणाले.
अरविंद केजरीवाल म्हणाले, “मी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना दिल्लीच्या सरकारी शाळेला भेट देण्याचे निमंत्रण देतो. गुजरातमधील भाजप सरकारला 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. आम्ही 5 वर्षात इथल्या सर्व शाळा दुरुस्त केल्या नही तर आम्ही येथून पळून जावू.
केजरीवाल पुढं म्हणाले, “गुजरातमधील भाजप सरकारने पेपर लीकचा जागतिक विक्रम केला आहे. मी भूपेंद्र पटेल यांना आव्हान देतो की त्यांनी पेपर लीक न होऊ देता परीक्षा घेऊन दाखवावी.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गुजरातमधील भाजप नेत्यांच्या बैठकीची केजरीवाल यांनी खिल्ली उडवली होती. तसेच भाजप पुढील आठवड्यात गुजरात विधानसभा विसर्जित करून निवडणुका जाहीर करणार आहे का, असा सवाल त्यांनी केला.