नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावती यांनी पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर यूपीमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी गुरुवारी प्रतिक्रिया दिली होती. आता भाजप खासदार साक्षी महाराज यांनी देखील मायावती यांनी पंतप्रधान होण्याच्या इच्छेवर आपलं मत व्यक्त केलं.
भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी म्हटलं की, बसपा प्रमुख मायावती आज जिवंत आहेत, तर फक्त भाजपमुळे, नाही तर समाजवादी पक्षाने त्यांना कधीच मारले असते. त्याचवेळी त्यांनी शिवपाल आणि अखिलेश यादव यांच्यावरही भाष्य केलं. अखिलेश आणि शिवपाल यादाव वाद ही त्यांची कौटुंबिक बाब असल्याचे साक्षी महाराज यांनी म्हटलं.
मायावतींनी पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केल्यावर, सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की आपल्याला देखील मायावती यांनी पंतप्रधान व्हावं असंच वाटत होतं. त्यामुळेच 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत आपण त्यांच्या पक्षाशी युती केली होती. त्यांची युती कायम राहिली असती तर बसपा आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या अनुयायांनी कोण पंतप्रधान होणार हे पाहिले असते, असही अखिलेश यांनी म्हटलं होतं.
मायावती म्हणाल्या होत्या की, त्या यूपीच्या मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहू शकतात, पण देशाच्या राष्ट्रपती होण्याचे स्वप्न कधीही पाहू शकत नाही. तेव्हापासून या साऱ्या चर्चेला उधाण आले आहे.