पुणे – वाहनधारकांना ठराविक कालावधीनंतर वाहनाची पीयूसी चाचणी करणे आवश्यक असते. यासाठी आकारण्यात येणाऱ्या दरात वाढ झाली असून, याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. सर्व वाहन प्रकारांमध्ये पूर्वीपेक्षा 15 ते 40 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता दुचाकीसाठी 50 रुपये आणि चारचाकीसाटी 125, तर डीझेल वाहनांसाठी 150 रुपये मोजावे लागणार आहेत.
केंद्रीय परिवहन मंत्रायलयाच्या आदेशानुसार पीयुसी यंत्रणा ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रचालकांना इंटरनेट, कॅमेरा आदी अद्ययावत उपकरणांची व्यवस्था करावी लागत असून ही प्रक्रिया खर्चिक आहे. यातच 2011 पासून दरात वाढ झाली नसल्याने केंद्रचालकांना आर्थिक फटका सहन करावा लागत होता. त्यामुळे पीयूसी दरात वाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर दरवाढीस मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आदेश काढले आहेत. यासह प्रत्येक पीयुसी केंद्रांवर सुधारित दरफलक दर्शनी भागात प्रदर्शित करावे. यासह संबंधित कार्यालयांच्या वायुवेग तपासणी पथकाकडून केंद्रांना भेटी देत तपासणी करावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.