पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या प्रारूप विकास आराखड्यांवरील हरकतींची सध्या सुनावणी सुरू आहे. खडकवासला केंद्रातील 13 गावे तर सासवड केंद्रातील 12 गावांतील हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे. दि.5 मे ते दि.12 मे पर्यंत या गावातील हरकतींवर सुनावणी होणार आहे.
पीएमआरडीएने दि.1 ऑगस्ट 2021 रोजी प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला होता. दीड महिन्यांत त्यावर तब्बल 61 हजार हरकती दाखल झाल्या आहेत. सुनावणीसाठी सात जणांची महानगर नियोजन समिती गठीत केली आहे. आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या कार्यालयात या हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली. खडकवासला केंद्रातील 13 गावे पुढीलप्रमाणे : भिलारेवाडी, नांदोशी, किरकटवाडी, सणसनगर, निंबाळकरवाडी, खडकवासला, नांदेड, मांगडेवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, नऱ्हे, कोंढवे-धावडे आणि कोपरे या गावांतील हरकतीधारकांची येत्या 5 मे, 6 मे ते 9 मे या कालावधीत सकाळी 10 ते 1:30 आणि दुपारी 2:30 ते 5 या दरम्यान सुनावण्या आकुर्डी येथील कार्यालयात होणार आहे. सासवड विकसन केंद्रातील अंबोडी, काळेवाडी, गूऱ्होळी, कुंभारवळण, दिवे, सिंगापूर, सोनोरी या गावांतील हरकतींवर दि.10 मे ते दि.12 मे या कालावधीत सुनावण्या होणार आहेत.