काबुल – गेल्यावर्षी अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची राजवट प्रस्थापित झाल्यानंतर त्यांनी अनेक सामाजिक नियमांमध्ये बदल केले आहेत. आता नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर तालिबानी राजवटीने शिक्षण क्षेत्रासाठी काही नवीन नियमांची घोषणा केली आहे. त्याप्रमाणे आठवड्यातील सहा दिवसांपैकी तीन दिवस मुले आणि तीन दिवस मुली शाळा किंवा महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येऊ शकतील. ज्या दिवशी मुले शिक्षण घेण्यासाठी येतील त्या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये मुलींना महाविद्यालय किंवा शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. आणि ज्या कालावधीमध्ये मुली शिक्षण घेत असतील त्या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये एकाही मुलाला शाळा किंवा महाविद्यालयमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
अफगाणिस्थानमधील नवीन शैक्षणिक वर्ष मे महिन्यामध्ये सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर तालिबान राजवटीने हे नियम जाहीर केले आहेत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याबाबतचे अधिकृत वेळापत्रकही जाहीर करण्यात येणार आहे. मुलांनी आणि मुलींनी एकत्र शिक्षण घेणे हे शरियत आणि इस्लामी कायद्याच्या विरोधात असल्याची घोषणा यापूर्वी अनेक वेळा तालिबान राजवटीनी केल्यामुळे अशा प्रकारचा निर्णय अपेक्षितच मानला जात आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तालिबान राजवटीने एक आदेश जारी केला होता त्या आदेशाप्रमाणे जर मुलं आणि मुलींना एकत्र शिक्षण घ्यायचे असेल तर वर्गामध्ये एक मोठा पडदा मध्ये ठेवण्यात यावा अशी सुचना करण्यात आली होती. पण आता अफगाणिस्तानच्या उच्च शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन नियमाप्रमाणे मुले आणि मुलींना एकत्र शिक्षण घेता येणार नाही. तर आठवड्यातील निम्मे दिवस मुले आणि मुलींना वाटून देण्यात आले आहेत.
तालिबान राजवटीच्या या जाचक शिक्षण धोरणाच्या निषेधार्थ मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेकांनी राजधानी काबूलमध्ये निदर्शने केली होती. अशा प्रकारची निदर्शने करणाऱ्यांवर तालिबानी सरकारने कोणतीही कारवाई केली नसली तरी निदर्शकांनी केलेल्या मागणीची कोणतीही दखल तालिबानी राजवटनी घेतलेली नाही.