मुंबई – सर्वसामान्यांचे महागाईने कबंरडे मोडले आहे. खाद्य तेलापासून ते इंधन दरवाढीपर्यंत महागाईचा भडका उडालेला दिसत आहे. कालच एक मे पासून केस कापणे, दाढी करणे महाग झाल्याची बातमी ताजी असताना आता रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजीच्या दरात सतत होत असणाऱ्या वाढीमुळे टॅक्सी आणि रिक्षाचे भाडेवाढ करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.
सीएनजीच्या दरात वाढ होत असल्यामुळे टॅक्सी व रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली आहे. रिक्षाची भाडेवाढ 2 ते 3 रुपयांनी वाढवण्याची मागणी संघटनांनी केली आहे तर टॅक्सी संघटनांनी 5 रुपये भाडेवाढीची मागणी केली आहे. याबाबत आता परिवहन विभागाकडून चाचपणी सुरु आहे. याआधी मार्च 2021 मध्ये टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आली होती.