पुणे -महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करूनही नदीपात्र तसेच महापालिकेच्या मालकीच्या जलतरण तलावातील जलपर्णीची समस्या जैसे थेच आहे. त्यामुळे आता महापालिकेनेच जलपर्णीचा नायनाट करण्यासाठी संशोधक कंपन्यांकडून “एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ मागविले असल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी दिले. त्यानुसार, पाषण तलावासाठी हे प्रस्ताव मागवले आहेत. त्यात, जलपर्णीची वाढ रोखणे, जलपर्णी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने काढणे, ती काढल्यानंतर तीची वाहतूक करणे तसेच विल्हेवाट लावणे याबाबी या प्रस्तावात अपेक्षित असल्याचे डॉ. खेमणार यांनी स्पष्ट केले.
शहरातून वाहणाऱ्या मुठा-मुळा नद्यांसह शहराच्या आसपास असलेल्या तलावांमध्ये नागरीकरणामुळे जलपर्णीची समस्या वाढली आहे. त्यामुळे, पाण्याच्या दुर्गंधीसह डासांची समस्याही लक्षणीय प्रमाणात वाढली असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका ही जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी ठेकेदारांची नेमणूक करते, तसेच ही जलपर्णी मुळापासून न काढता स्पायडर मशिनद्वारे वरच्या वर काढली जात असल्याने तीन ते चार दिवसांत ती पुन्हा तेवढीच वाढते. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करूनही महापालिकेस पुणेकरांच्या टिकेचा सामना करावा लागतो. त्यामुळे जलपर्णीवर कायमचा उपाय शोधण्यासाठी महापालिकेकडून पावले उचलण्यात आली आहेत. त्यांतर्गत जलपर्णी रोखण्यासाठी अथवा जलपर्णी काढल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी संधोधन केलेल्या संस्थांचे प्रस्ताव महापालिकेने मागविले असल्याचे डॉ. खेमणार यांनी स्पष्ट केले.
पाण्याखाली जाऊन काढणार जलपर्णी
महापालिकेकडून सध्या शहरातील जलपर्णी काढण्यासाठी स्पायडर मशिनचा वापर केला जातो. त्यांतर्गत ही मशिन जलपर्णी पाण्याखाली न तोडता ती केवळ ओढून काढते. त्यामुळे सरसकट न निघता ती अर्धवट तुटून निघते. मात्र, पुढे तीन ते चार दिवसांतच ती पुन्हा तेवढीच वाढते. त्यामुळे पालिकेकडून आता पाण्याखाली जाऊन जलपर्णी तोडण्याच्या अटीचा समावेश जलपर्णी काढण्याच्या निविदेमध्ये पहिल्यांदाच केला जाणार असल्याचे डॉ. खेमणार यांनी स्पष्ट केले.