नवी दिल्ली – बॅंकेच्या तिजोरीतून तब्बल 11 कोटी रूपये मुल्याची नाणी गायब झाल्याची सनसनाटी माहिती समोर आली. त्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयने हाती घेतला आहे.
राजस्थानमधील भारतीय स्टेट बॅंकेच्या (एसबीआय) एका शाखेतून ती कोट्यवधींची नाणी गायब झाली. संबंधित शाखेच्या रोकड साठ्यात तफावत असल्याचे प्राथमिक चौकशीवेळी बॅंकेच्या निदर्शनास आले. त्यानंतर नाणी मोजण्याची जबाबदारी एका खासगी व्हेंडरकडे सोपवण्यात आली. बॅंकेकडे 13 कोटी रूपये मुल्याची नाणी असल्याची माहिती होती. मात्र, मोजणीवेळी 11 कोटी रूपये मुल्याची नाणी तिजोरीत नसल्याचे उघड झाले.
केवळ 3 हजार बॅग्जमध्ये ठेवण्यात आलेल्या 2 कोटी रूपये मुल्याच्या नाण्यांचा हिशेब लागला. बॅंकेने राजस्थान उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावून सीबीआय तपासाची मागणी केली. न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआयने राजस्थान पोलिसांकडील तपास आपल्या हाती घेतला. त्या प्रकरणी राजस्थान पोलिसांनी याआधीच गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, नाणी मोजण्यासाठी आलेल्या व्हेंडरच्या कर्मचाऱ्यांना 10 ऑगस्ट 2021 च्या रात्री धमकावण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यावेळी संबंधित कर्मचारी एका गेस्टहाऊसमध्ये राहत होते. नाण्यांची मोजणी न करण्याची धमकी त्यांना देण्यात आली होती. त्याचाही तपास होणार असल्याचे समजते.