मुंबई – मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज इशान किशन लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात 13 धावावंर बाद झाला. बाद होऊन डगआऊटमध्ये परतत असताना त्याला आपली निराशा लपवता आली नाही व त्याने आपली बॅट सिमारेषेवर लावलेल्या फलकांवर आपटली. त्याच्या या कृतीवर मैदानावरील पंचांनी हरकत घेतली असून त्याच्यावर कारवाई देखील होऊ शकते असे संकेत दिले आहेत.
इशान किशनला ही चूक महागात पडू शकते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इशान किशनचे हे कृत्य आयपीएलच्या आचारसंहितेच्या उल्लंघनाखाली येण्याची शक्यता आहे. या कृत्यासाठी इशान किशनला दंड किंवा ताकीद दिली जाऊ शकते.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 81 धावांची खेळी केली होती. मात्र, त्यानंतर त्याला सातत्य राखता आले नाही. मुंबईने त्याला यंदाच्या मोसमापूर्वी झालेल्या लिलावात तब्बल 15 कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केले होते. IPL 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये इशान किशन उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. इशानने दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात अनुक्रमे नाबाद 81 आणि 54 धावांची खेळी केली. पण यानंतर त्याने शेवटच्या चार डावात 14, 26, 3 आणि 13 धावा केल्या आहेत. म्हणजे किशनच्या बॅटने या मोसमात सहा डावात 38.20 च्या सरासरीने आणि 117.17 च्या स्ट्राईक रेटने 191 धावा केल्या आहेत.
दरम्यान, मुंबई इंडियन्सचा संघ सध्या प्रचंड खराब फॉर्ममध्ये आहे. आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडियन्सचा हा सर्वात वाईट सीजन असेल. एकापाठोपाठ एक असे मुंबई इंडियन्सने सहा सामने गमावले आहेत. मुंबई इंडियन्स आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. पण सध्या त्यांना त्यांच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
आयपीएल 2022 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पराभवाने मुंबई इंडियन्सची सुरुवात झाली होती. त्यानंतर राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, पंजाब किंग्स आणि काल लखनौ सुपर जायंट्सकडून मुंबई इंडियन्सचा संघ पराभूत झाला. गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ शेवटच्या स्थानी आहे.