भुवनेश्वर – भारतीय पुरुष हॉकी संघाने अननुभवी जर्मनी संघावर ३-१ असा विजय मिळवून एफआयएच प्रो लीगमधील आपले वर्चस्व कायम ठेवले. या दुसऱ्या विजयाने भारताने एफआयच प्रो लीग मालिकेतील मायदेशातील आपल्या मोहिमेची विजयी सांगता केली.
भारताकडून सुखजीत सिंग (१९वे मिनिट), वरुण कुमार (४१वे मिनिट), अभिषेक (५४वे मिनिट), तर जर्मनीचा एकमात्र गोल अॅन्टोन बोएकेल (४५वे मिनिट) याने गोल केला.
पूर्वार्धात सामन्यावर भारताचे पूर्ण वर्चस्व होते. त्यांनी गोलपोस्टच्या दिशेने मारलेल्या तीन शॉटसपैकी केवळ एकावरच गोल होऊ शकसला. उत्तरार्धात भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण, जर्मनीचा गोलरक्षक जीन डॅनबर्ग याने सुरेख बचाव केला. सामन्याच्या ४१व्या मिनिटाला शैलेंद्र लाक्राने आणखी एक कॉर्नर भारताला मिळवून दिला. या वेळी मात्र वरुण कुमारने तो सत्कारणी लावताना भारताचा दुसरा गोल केला. त्यानंतर चार मिनिटांनी बोएकेल याने जर्मनीचा पहिला गोल केला. याव्यतिरिक्त भारतीय संघ आता १२ सामन्यांनंतर २७ गुणांसह गुणतक्त्यात आघाडीवर आहे. जर्मनी १० सामन्यांनंतर १७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.