मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज ब्रीच कॅंडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मंगळवारी त्यांना थकवा आणि भोवळ आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयातून बाहेर पडताना मुंडे यांनी आता प्रकृती चांगली असल्याचे सांगितले. तसेच माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणारे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक, रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करणारे सर्व पक्षाचे नेते मंडळी व डॉक्टरांचे त्यांनी आभार व्यक्त केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच मी पुन्हा पूर्वीसारखा बरा होऊन जनसेवेत दाखल होईल असे ते म्हणाले.
डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे कार्यकर्त्यांनी काही दिवस भेटीसाठी येऊ नये मी स्वतः लवकरात लवकर स्वतः कार्यकर्त्यांना येऊन भेटेल असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री राजेंद्र शिंगणे, पार्थ पवार, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे, किशोरी पेडणेकर, राजेश टोपे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेऊन चौकशी केली.