मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यात झालेल्या ‘उत्तर सभे’त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. शरद पवार हे नास्तिक असल्याचा उल्लेखही राज यांनी आपल्या भाषणामध्ये केला. तसेच शरद पवार हे कधी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलत नाही असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.
ठाण्यातील ‘उत्तर सभेत राज ठाकरे यांनी चौफेर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पवार कुटुंबावर गंभीर आरोप केले आहे. सध्या राज्यातील राजकारण या सभेनंतर चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांच्या आरोपांवर आता महाविकास आघाडीतील नेत्यांनीही प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशात आता मुबंईत राज ठाकरेंविरोधात बॅनर लावण्यात आले आहेत.
शिवसेना भवनासमोर राज ठाकरे यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. काल मुस्लिम, आज हनुमान आणि उद्या??? अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. अज्ञात व्यक्तींनी शिवसेना भवनासमोर पोस्टर लावले आहेत.
दरम्यान, शिवसेना भवनासमोर राज ठाकरे यांच्याविरोधात हे पोस्टर लावण्यात आले आहे. पोस्टरवर तीन फोटोंची जागा आहे. मात्र, यातील एक जागा रिकामी ठेवून, राज ठाकरेंची पुढील भूमिका काय असेल? याबाबत प्रश्न उपस्थित केला गेला आहे.