पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाने “एनओसी’ अर्थात ना हरकत दाखला देऊन तसेच इतर शुल्कांद्वारे महापालिकेला तब्बल 205 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. 50 कोटींचे उदिष्ट असताना इतिहासात प्रथमच 205 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे कर संकलन, बांधकाम परवानगी, भूमी जिंदगीपाठोपाठ अग्निशामक दलही महापालिकेच्या तिजोरीत चांगलाच भरणा करत आहे.
महापालिका उत्पन्नाच्या दृष्टीने मिळकत कर, बांधकाम परवाना, पाणीपट्टी, आकाश चिन्ह परवाना हे विभाग अत्यंत महत्वाचे आहेत. या विभागात महापालिकेला तब्बल 1700 कोटी रूपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. मात्र, आत्तापर्यंत दुर्लक्षित असलेला विभाग म्हणजे अग्निशामक विभाग. मात्र, या विभागाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून उत्पन्न सातत्याने वाढत आहे.
अग्निशामक विभागाच्या वतीने शहरातील इमारती, व्यवसाय, उद्योग धंद्यांना ना हरकत दाखला दिला जातो. तसेच एखाद्या कार्यक्रम स्थळी आगीची घटना घडल्यास अग्निशामक दलाची गाडी त्वरीत उपलब्ध व्हावी, यासाठी कार्यक्रमस्थळी स्टॅन्ड बाय अग्निशामक दलाची गाडी ठेवणे बंधनकारक असते. यासाठी महापालिका 5 हजार रूपये शुल्क घेत असते. ना हरकत दाखला देणे, सशुल्क स्टॅन्ड बाय अग्निशामक दलाची गाडी देणे आणि एखाद्या ठिकाणी पाणी फवारणे यातून अग्निशामक विभागाला उत्पन्न मिळत असते. याचबरोबर शहर परिसरातील चारही बाजूने झपाट्याने बांधकाम प्रकल्प होत आहेत. या बांधकाम प्रकल्पांना अग्निशामक दलाला ना हरकत दाखला घेणे बंधनकारक असते.
2021-22 या आर्थिक वर्षांत नवीन बांधकामांची संख्या लक्षणीय वाढ झाली असून बांधकाम परवानगीतून महापालिकेला तब्बल 1 हजार 30 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे अग्निशामक विभागाला इतिहासात प्रथमच 205 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. अग्निशामक विभागाला 2018-19 मध्ये 75 कोटी, 2019-20 मध्ये 65 कोटी तर 2020-21 मध्ये 53 कोटी तर 2021-22 या आर्थिक वर्षांत 50 कोटींचे उदिष्ट असताना 205 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
2021-22 या आर्थिक वर्षांत शहर परिसरात नव्याने बांधकामे मंजूर होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे या बांधकाम ना हरकत दाखला आणि अन्य बाबीतून अग्निशामक दलाला आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे 205 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेच्या उत्पन्नात आमच्याही विभागाचा चांगला वाटा झाला असल्यामुळे समाधान वाटत आहे. मात्र, आगामी आर्थिक वर्षांत एवढे उत्पन्न मिळेल की नाही याबाबत साशंकता वाटत आहे.
– किरण गावडे, मुख्य अग्निशामन अधिकारी, मनपा.
=================