फुरसुंगी –मंतरवाडी चौक ते हांडेवाडी चौकदरम्यान बाह्यवळण मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतपणे अवजड वाहने अनेक दिवस उभी असतात. हा मार्ग म्हणजे अवजड तसेच मालवाहू वाहनांसाठी फुकटचा पार्किंग झोन झाला आहे. हांडेवाडी वाहतूक पोलीस विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने स्थानिक तसेच अन्य राज्यांतील अनेक वाहने या ठिकाणी अगदी महिनाभरही पार्क केली जात आहेत.
सोलापूर महामार्गावरून शहरात जाणारी सर्व अवजड वाहतूक हडपसर-गाडीतळमार्गे सासवडमार्गे वळवून मंतरवाडी चौकातून कात्रज बाह्यवळण मार्गावर वळविल्याने या मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत आहे. दिवसभर तसेच रात्री-अपरात्री या रस्त्यावरून अवजड वाहतूक सुरूच असते. माल पोहोचविण्यासाठी आलेली ही वाहने रांगा लांवून थांबतात तर बहुतांशी रिकामी झालेली वाहने दुसरे भाडे मिळेपर्यंत येथे थांबवून ठेवले जातात. हा मार्ग हांडेवाडी, उंड्री, पिसोळी या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातून जात असल्याने या रस्त्यावर अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यालगत अवजड वाहने थांबविली जात असल्याने रस्ता अरुंद झाला असून यातून वाहतूक कोंडी होत आहे. काही ठिकाणी हा रस्ता चढ-उतारांचा असल्याने तो दुचाकी तसेच अन्य हलक्या वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे.
हांडेवाडी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी बार, अँगल, पाइप व बांधकामाचे लोखंड विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात मोठमोठी दुकाने आहेत. या दुकानांमधून ट्रकच्या ट्रक बाहेर पडतात. मात्र या व्यावसायिकांनी दुकानात माल घेऊन येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी कोठेही पार्किंग किंवा वाहने उभी करण्यासाठी जागा ठेवलेली नसल्याने ही सर्व वाहने रस्त्याकडेलाच उभी केली जात असल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तसेच या ठिकाणी अनेक वजनकाटे असून वजनकाटेसुद्धा रस्त्यालगतच आहेत. त्यामुळे वजन करण्यासाठी येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा भर रस्त्यातच लागत असल्याने वाहतूककोंडी होत आहे. हांडेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस कोणतीच कारवाई का करीत नाहीत ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.