पुणे- केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांत पेट्रोल, डीझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. राज्यातही इंधनदराचा उच्चांकी आकडा गाठला गेला आहे. याचाच गैरफायदा घेत शहर तसेच उनगरांतील काही ठिकाणच्या पेट्रोल पंपावर भेसळ तसेच कमी इंधन भरल्याच्या तक्रारी असे प्रकार घडलेले आहेत. महागाईचा भडका उडत असताना सर्वसामान्य व्यक्तीला सध्या एका रुपयाचीही मोठी किंमत वाटू लागली आहे. त्यामुळेच दिलेल्या पैशांचे पूर्ण इंधन आपल्याला मिळावे, अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळेच आपल्या वाहनात इंधन भरताना पेट्रोल पंपावर सावध राहणे ही ग्राहक म्हणून आपलीच जबाबदारी ठरत आहे.
वाहनात इंधन भरताना काय करावे…
आपण पंपावर गेलो असता 100, 200 किंवा 500 अशा राउंड फीगर रुपयांत पेट्रोल किंवा डीझेल भरतो. परंतु, अनेकदा पंपावरील मशीनवर राउंड फीगरच्या किमतीचे इंधन फिक्स करून ठेवलेले असू शकते. असे फिक्स केलेले असेल तर आपल्याला पूर्ण रकमेचे इंधन मिळत नाही. त्यामुळे 110, 220, 340 अशा ऑड रकमेचे इंधन भरावे.
दुचाकी किंवा चारचाकीच्या टाक्या मोठ्या असतील तर त्या बहुतांशी वेळा पूर्ण भरत नाहीत. गरजेपुरतेच इंधन आपण भरतो. अशावेळी टाकी जितकी रिकामी तितकी त्यात हवा अधिक असते, अशा वेळी पेट्रोल, डीझेल भरल्यास हवेमुळे पेट्रोल कमी होते. त्यामुळे निम्मी टाकी नेहमी भरलेली ठेवणे कधीही चांगलेच.
पंपावर अनेक वेळा मीटरच्या हेराफेरी केल्या जाऊ शकतात. काही पंपांवरव अजूनही जुन्या तंत्रावर चालणारी यंत्रणा आहे, त्यामध्ये फेरबदल करून ठेवणे सोपे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पंपावरील यंत्रणा कशी आहे. याचीही पाहणी आणि माहिती घेणे गरजेचे ठरते.
अनेकदा पेट्रोल मशीनमध्ये रीडिंग कोणत्या अंकापासून सुरू झालं हे पाहणं गरजेचं आहे. मीटरचं रीडिंग 10, 15, 20 पासून सुरू होत असेल तर आपली फसवणूक होत आहे, हे समजावे. सध्याच्या इंधन दरानुसार मीटर रीडिंग हे कमीत कमी 3 या अंकापासून सुरू होणे गरजेचे आहे.