पुणे – शिक्षण आयुक्तालयांच्या पाठोपाठ आता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरही दहा कृती गट (टास्क फोर्स)ची निर्मिती केली आहे.
बदलत्या तंत्रज्ञानामुळे प्रशासनामध्ये बदल करण्याची गरज, सेवांच्या गुणवत्तेत वाढ, लोकाभिमुख व निर्णयशील, सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरिता कृतिगटांची स्थापना करण्यात आली आहे. कृतिगट प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त दोन ते तीन सहाय्यभूत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या गटास दिलेल्या कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करून कामकाजास सुरुवात करावी. त्याअनुषंगाने दिलेल्या उद्दिष्टांची कालमर्यादेत पूर्तता करण्याच्या दृष्टीने कामकाजाचे नियोजन करावे लागणार आहे. प्रत्येकी पंधरा दिवसांनी कामकाजातील प्रगतीचा आढावा सादर करण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. प्रगती आढाव्यासाठी विविध प्रकारची प्रपत्रे विकसित करण्यात यावीत.
कृतिगटाच्या कामकाजात विशेष प्रगती अथवा उल्लेखनिय कामगिरी केल्यास त्याबाबतची नोंद तसेच दुर्लक्ष अथवा दिरंगाई झाल्यास त्याबाबतची नोंद कृतिगटातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवापुस्तकात घेण्यात येणार आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी आदेशात स्पष्ट
केले आहे.
कृतिगट प्रमुख आणि जबाबदारी
हरुन आत्तार : सर्व कृतिगट समन्वय. डॉ.वंदना वाहुळ : ई गव्हर्नन्स कृती गट. दीपक चवणे : क्षेत्रीय कार्यालयाची कार्यालयीन तपासणी, दक्षता पथकाचे कामकाज. कलमकिशोर राठी : शासन निर्णय, न्यायनिवाडे आदी संदर्भात प्रबोधन. प्रसाद कालगावकर : मंत्रालय स्तरावरील संदर्भ व तक्रारी. ज्योती शिंदे : शीघ्रसंदर्भ निराकरण, संजय गंभीरे-कक्ष व्यवस्थापन. कुंदा पंडीत : जनसंपर्क, अभ्यागतांचे तातडीचे व महत्वाचे संदर्भ. राजेश साठे : बैठक व्यवस्थापन व शिक्षण संचालक यांच्या अध्यक्षतेखालील विविध समित्यांच्या कामकाजाचे नियोजन.