लाहोर – ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाने ऐतिहासिक कामगिरी करताना 3 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकून मोठा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाने अखेरचा आणि तिसरा कसोटी सामना 115 धावांनी जिंकत ही कामगिरी केली आहे. या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना अनिर्णित राहिला होता.
या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर अखेरच्या डावात 351 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा दुसरा डाव 92.1 षटकात सर्वबाद 235 धावांवर संपुष्टात आला. यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 115 धावांनी जिंकण्यात मालिकाही खिशात घातली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 391 धावा उभारल्या होत्या. यानंतर पाकिस्तानला पहिल्या डावात 268 धावांवर रोखत ऑस्ट्रेलियाने 123 धावांची निर्णायक आघाडी घेतली होती.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये ऑस्ट्रेलियाने मिळवलेला हा तिसरा कसोटी मालिका विजय ठरला आहे. यापूर्वी 1959 मध्ये रिची बेनॉड यांच्या नेतृत्त्वाखाली 2-0 अशा फरकाने, तर मार्क टेलरच्या नेतृत्त्वाखाली 1998 साली 1-0 अशा फरकाने ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केले होते. त्यानंतर तब्बल 24 वर्षांनी ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानला त्यांच्या मायदेशात पराभवाचा धक्का दिला आहे.