पुणे – राहते घर आणि दुकान खाली करण्याची धमकी देत व्यावसायिकाकडून दीड लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथक एकने अटक केली. आरोपींवर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी उर्फ अक्षय नंदु हिरणवार (24, रा. रामटेकडी), शाहरूख इकलाख सय्यद (28,रा. महर्षीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी व्यावसायिक हसमुख जबेरचंद ओसवाल (सेंटर स्ट्रीट, कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी ओसवाल यांचा कॅम्पात कपड्यांचा व्यवसाय आहे. आरोपींनी ओसवाल यांना त्यांचे दुकान आणि राहत्या घराची जागा खाली करण्याची धमकी दिली. आम्हाला तुझे घर खाली करण्याची सुपारी मिळाली, दुकानातील माल बाहेर फेकून देत आम्ही दुकान खाली करणार आहोत. तु आमचे काहीही करू शकणार नाही, असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली.
यानंतर मांडवलीसाठी व काही न करण्यासाठी ओसवाल यांच्याकडे तीन लाख रूपयांची मागणी करत दीड लाख रूपये स्विकारताना खंडणी विरोधी पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी कुणाच्या सांगण्यावरून खंडणी घेतली, त्यांचे इतर साथीदार याचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव करीत आहेत.