पुणे – युक्रेन आणि रशिया युद्धाचा परिणाम जगभरातील 193 पेक्षा जास्त देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. याचा परिणाम जागतिक बाजारपेठेतील दूध पावडर आणि बटरच्या दरवाढीवरही झाला आहे. युक्रेनमधून होणारी निर्यात बंद झाल्याने भारतातील दूध पावडरला जागतिक बाजारातून मागणी वाढली आहे. त्यामुळे देशातून निर्यात वाढणार आहे. या निर्यातीचा दूध उत्पादकांना शेतकऱ्यांना लाभदायी ठरला आहे.
युक्रेन हा दूध पावडर निर्यात करणारा प्रमुख देश आहे. एकूण उत्पादनाच्या 10 टक्के उत्पादन फक्त युक्रेनमध्ये होते. युद्धामुळे दुग्धजन्य पदार्थांची मागणी भारतातून वाढली आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत दूध पावडरचे भाव प्रती किलो 230 ते 250 रुपयांवरून वाढून 280 ते 300 रूपये वाढले आहेत. तर बटरचे भाव प्रती किलो 320 ते 340 रूपयांवरून वाढून 380 ते 400 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे दूध खरेदीसाठी सहकारी संस्थांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. याचा एकत्रित परिणाम दूध खरेदीच्या दरावर झाला आहे. त्यामुळे दूध खरेदीचे दर वाढले आहेत. याचा सरळ फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
देशात जानेवारी 2022 पर्यंत 20 हजार मेट्रिक टन दूध पावडरचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दूध पावडरच्या उत्पादनात 11 टक्के वाढ झाली आहे. तर जानेवारी 2022 पर्यंत 15 हजार मेट्रिक टन बटर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बटर उत्पादनात 36 टक्के वाढ झाली आहे. देशात दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत तीन टक्के वाढ झाली आहे. जानेवारी 2022 पर्यंत सात लाख मिलियन टन उत्पादन झाले आहे. निर्यातीत 36 टक्के वाढ झाली असून 20 हजार मिलियन टन निर्यात केली आहे.
राज्यात पिशवी बंद दूध विक्रीसह दुग्धजन्य पदार्थांची मोठी बाजारपेठ आहे. दूध, तूप, दही, ताक, श्रीखंड, दूध पावडर, मलई, पनीर, कुकिंग बटर, टेबल बटर, अशी उत्पादने बाजारात आली आहेत. यातील बहुतांशी पदार्थांची निर्यात विविध देशात होत आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादनात पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश ही राज्ये अग्रेसर आहेत. देशातील दूध उत्पादक राज्ये आणि टक्केवारी पुढीलप्रमाणे- उत्तर प्रदेश (16.06 टक्के), राजस्थान (13 टक्के), मध्यप्रदेश (9 टक्के), आंध्रप्रदेश 8 टक्के, गुजरात (7 टक्के) इतकी आहे.